सिवान : महाराष्ट्रातून सुरू झालेला लाऊडस्पीकरवर (Loudspeaker Row) अजान आणि हनुमान चालिसाचा वाद आता देशभर गाजत आहे. सिवानमधील जेडीयू खासदार कविता सिंह (MP Kavita Singh) आणि त्यांच्या पतीनेही या वादात उडी घेतली आहे. आम्ही सनातन धर्म मानणारे लोक आहोत. हनुमानावर राजकारण होता कामा नये, असे खासदार कविता सिंह म्हणाल्या. तर यादरम्यान, त्यांचे पती अजय सिंह यांनीही अजान पाकिस्तानातच व्हायला पाहिजे, असे म्हटले आहे.
खासदार कविता सिंह आणि त्यांचे पती अजय सिंह सोमवारी सिवानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. खासदार कविता सिंह म्हणाल्या की, "सनातन धर्म सर्वात आधी आला आहे. आपला धर्म सुरुवातीपासूनच पुढे आहे. तुम्ही कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवू शकता, पण जो सनातन धर्म सर्वात पुढे राहिला आहे, त्यावर राजकारण होता कामा नये. हनुमान चालीसा मन लावून वाचावी, घरी वाचावी किंवा कुठेही वाचावी, त्यावर राजकारण होता कामा नये."
काय म्हणाले अजय सिंह?याचबरोबर, या कार्यक्रमात सहभागी असलेले खासदार कविता सिंह यांचे पती आणि जेडीयू नेते अजय सिंह यांनी अजान आणि हनुमान चालीसावरून वादग्रस्त विधान केले. अजय सिंह यांनी अजान पठण करणाऱ्या लोकांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले. ते म्हणाले की, "हा हनुमानाचा देश आणि पाकिस्तानचा अजान आहे. पाकिस्तानात अजान होते, कोणीही रोखायला जात नाही. हा हनुमानाचा देश आहे, इथे हनुमान चालीसा होईल. येथे हनुमानावर बंदी घालणाऱ्यांचा नायनाट होईल. जळून जातील. हनुमानावर बंदी घालणाऱ्यांची जळून राख होईल. जसे की लंका जळून राख झाली. हनुमान चालीसा शतकानुशतके म्हटली जात आहे आणि म्हटली जाईल." अजय सिंह यांनी पुढे पुनरुच्चार केला आणि सांगितले की अजान पाकिस्तानमध्येच झाली पाहिजे.