गोरेखपूर-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी शिवाय धार्मिक यात्रा, मिरवणुक काढली जाऊ नये आणि सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये सणासुदीच्या काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर योगींच्या या आदेशावर गोरखनाथ मंदिराच्या वतीनं एक अनोखे उदाहरण ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे.
गोरखपूरमध्ये सिद्धपीठ गोरक्षनाथ मंदिर परिसर, श्री मानसरोवर मंदिर परिसर आणि गोरखपूरमधील नाथ संप्रदायाच्या श्री मंगला देवी मंदिर परिसरातील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. आता मंदिराच्या बाहेर आवाज येणार नाही. गुरुवारपासून ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. मंदिराच्या माध्यम प्रभारींनी याला दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे मथुरेतील श्री कृष्णजन्मभूमीवरूनही लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.
सर्व लोकांना त्यांच्या धार्मिक विचारधारेनुसार त्यांच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक किंवा धार्मिक मिरवणूक काढू नये, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून स्पष्टपणे सांगितले होते. तसेच पारंपारिक मिरवणुकांनाच परवानगी द्यावी. शांतता आणि सलोखा राखण्याबाबतही संबंधितांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे असेही योगींनी निर्देश दिले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः गोरखनाथ पीठाचे महंत आहेत. मुख्य मंदिर परिसरातील लाऊडस्पीकर कमी करण्यात आले असून ते रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणांहूनही हटवण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील खरगोन, दिल्लीतील जहांगीरपुरी आणि अन्य काही ठिकाणी झालेल्या वादानंतर सरकार आणि प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत.