ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - प्रेमाला जात, धर्म, भाषा, देशोदेशीच्या सीमारेषा यांची बंधने नसतात, असे म्हटले जाते. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण आणि नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तुफान गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील तरुण आणि राजौरीमधील तरुणीने सीमेची बंधने मोडून निकाह करत प्रेमाची नवी कहाणी लिहिली आहॆ.
पाकव्याप्त काश्मीरमधील मोहम्मद आरिफने आपल्या प्रेमासाठी नियंत्रण रेषा पार केली. मीरपूर येथे राहणाऱ्या हसन मोहम्मद यांचा मुलगा असलेला आरिफ सोमवारी काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरदरम्यान चालणाऱ्या 'कारवा ए अमन' या बसमधून काश्मीरमध्ये आला.
मोहम्मद आरिफ हा 33 वर्षीय तरुण राजौरी जिल्ह्यातील तरुणीशी निकाह करण्यासाठी नियंत्रण रेषा पार करून सोमवारी काश्मीरमध्ये आला. दरम्यान, मंगळवारी त्याने राजौरी येथील धानी धर भागात राहणाऱ्या दिल मोहम्मद यांची मुलगी काजल साना हिच्याशी निकाह केला.
"नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू असताना असा निकाह होणे ही सकारात्मक बाब आहे. काश्मीरमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत. ज्यांचे नातेवाईक काश्मीरच्या दोन्ही भागात आहेत," असे राजौरीचे उपायुक्त शाबीर अहमद भट यांनी सांगितले. कायदा अशा विवाहांना नाकारत नाही. तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, जो पाकिस्तानने बळकावलेला आहे. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हा निकाह करणाऱ्या जोडप्याचे छायाचित्र काढू देण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला.