नवी दिल्ली : ‘किशोरवयीन प्रेम न्यायालयांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकत नाही. न्यायाधीशांनी अशा प्रकरणांमध्ये जामीन याचिका हाताळताना काळजी घ्यावी,’ असे मत व्यक्त करीत दिल्ली उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीशी सहमतीने संबंध ठेवल्यामुळे उद्भवलेल्या पॉक्सो प्रकरणात एका तरुणाला दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या की, कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन व्यक्तीची संमती महत्त्वाची नसली तरी किशोरवयीन युगुलांच्या पलायनाच्या प्रकरणांमध्ये न्यायालय गुन्हेगारांशी व्यवहार करत नाही तर किशोरवयीन व्यक्ती ज्यांना प्रेमात त्यांचे जीवन योग्य वाटेल तसे जगायचे असते, त्यांच्याशी संबंधित आहे.’
न्यायालयाने नमूद केले की, फिर्यादी आणि आरोपी हे त्या वेळी अनुक्रमे १६ व १९ वर्षे वयाचे होते आणि आता त्यांचे लग्न होणार आहे. त्यामुळे त्याला दोन महिन्यांसाठी जामिनावर सोडावे. यातील मुख्य आरोपी गुन्हेगार नाही, तर केवळ प्रेमात पडलेला तरुण होता . तो तिला दिल्लीपासून २२०० किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी घेऊन गेला होता. प्रेमींना स्वतःला योग्य वाटेल तसे जीवन जगण्याचा अधिकार आहे,’ असे न्यायालयाने ८ मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.