ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - हत्या आणि लव्ह जिहादसारख्या घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही असे सूचक विधान करत रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला आहे.
सर्वसामान्यांना व्याजदर कपातीची भेट देणारे गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी दादरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारला निशाणा साधला. अराजक तत्व विकासात नेहमीच अडथळे आणत असतात. अर्थमंत्री अरुण जेटलींनीही अशा तत्वांनी अडथळे आणण्याऐवजी विकासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.असे अराजक तत्व भारतासाठी चिंतेचा विषय असून कायद्याच्या आधारेच यावर तोडगा निघू शकेल असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना देशाला विकासाच्या वाटेवर न्यायचे असून यासाठी ते प्रयत्नही करत आहेत. पण लव्ह जिहाद, हत्यासारख्या घटनांमुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असे त्यांनी नमूद केले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे सांगत त्यांनी अर्थमंत्रालयासोबत मतभेद असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.