टिंडर ॲपवर ओळख झालेल्या २८ वर्षीय तरुणाची प्रेमाचे नाटक करून हत्या केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जयपूरच्या एका कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.
२७ वर्षीय प्रिया सेठ या मुख्य आरोपी महिलेने टिंडरवर दुष्यंत शर्मा या तरुणाशी मैत्री केली. तीन महिने चॅटिंग केल्यानंतर दोघेही भेटू लागले. दुष्यंत श्रीमंत व्यक्ती असल्याचे प्रियाला वाटले होते. त्यामुळे तिने त्याच्या अपहरणाचा प्लॅन आखला.
प्रियाने दुष्यंतला फोन करून घरी बोलावले. यावेळी तिचा प्रियकर दीक्षान्त कामरा आणि आणखी एक तरुण लक्ष्य वालिया उपस्थित होते. यावेळी दुष्यंतचे तिघांनी अपहरण केले आणि त्याच्या आई-वडिलांकडे १० लाखांची खंडणी मागितली. त्याच्या आईवडिलांनी घाबरून ३ लाख रुपये दिले. मात्र आणखी पैसे देण्यास त्यांनी नकार दिला.
जर आपण दुष्यंतला सोडले तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल या भीतीने तिघांनी त्याची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरत सुटकेस दिल्ली रोडवर फेकून दिली. यावेळी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी फ्लॅटही धुऊन काढला होता. मात्र पोलिसांनी घटनेचा माग काढत याच फ्लॅटमधून तिघांना अटक केली. प्रियाचा प्रियकर दीक्षान्त कर्जबाजारी झाल्याने तिने दुष्यंतला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते, असे पोलिसांनी सांगितले.