प्रेमासाठी वाट्टेल ते.. म्हणत केवळ गावच्या नाहीत तर देशाच्या सीमाही ओलांडल्या. प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं म्हणतात. प्रेम हे जात, धर्म, शहर, देश बघून होत नाही. प्रेम हे कधीही, कुठेही आणि कुणावरही होऊ शकतं. मी तिला पाहिलं अन् प्रेमात पडलो... हे वाक्य आपण ऐकलच असेल. त्यामुळेच, प्रेमासाठी कायपण करायची तयारी प्रेमीयुगलांची असते. अशीच एक प्रेमकथा मोरक्को आणि भारत देशांना जोडणारी आहे.
मोरक्को देशाच्या फादवा लैमाली हिने तब्बल 8000 किमीचा प्रवास करत भारतीय युवकाशी लग्नगाठ बांधली. मध्य प्रदेशच्या ग्वालियरच्या अविनाश दोहरे या युवकावर फादवाचा जीव जडला. सोशल मीडियातून या दोघांची ओळख झाली. त्यानंतर, दोस्ती आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. लग्नगाठ बांधण्यापूर्वी फादवाने अविनाशच्या प्रेमाची परिक्षाही घेतली. दोघांनी लग्नाची गोष्ट घरच्यांना सांगितली. त्यावेळी, कुटुंबीयांनी विरोध केला, पण दोघांनी मनाचीही खूनगाठ बांधली होती. विशेष म्हणजे फादवाने आपल्या कुटुंबीयांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. तब्बल तीन वर्षे तीने प्रयत्न केले. अखेर कुटुंबीयांनी माघार घेत फादवाला लग्नाची परवानगी घेतली.
वडिलांच्या परवानगीनंतर फादवा 4 महिन्यांपूर्वी भारतात आली. भारतात आल्यानंतर कायदेशीर अडचणींना तिला सामोरे जावे लागले. मात्र, त्यावर मात करुन तिने प्रेमयुद्ध जिंकलं. फादवा आणि अविनाश यांची भेट इंस्टाग्राम अकाउंटवर झाली होती. फादवा ही ग्वालियरच्या विद्यापीठात मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. ती इंग्रजीमिक्स अरबी बोलत होती. कन्सल्टन्सीमध्ये काम करत असल्याचा अविनाशला फायदा झाला. त्यामुळेच, फादवाची भाषा त्याला सहजपणे अवगत झाली. त्यामुळे, दोघांनी एकमेकांच्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल माहिती घेतली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं अन् या प्रेमाचा शेवट दोन मनं व कुटुंबीय एकत्र होऊन शुभ मंगल सावधान झालं.
फादवा जशी मोरक्को येथे राहत होती, तशीच ती भारतातही राहिल. तिला धर्मपरिवर्तन करायची गरज नाही, असा विश्वास अविनाशने फादवाच्या वडिलांना दिला. त्यानंतर, लग्नाचं ठरलं. आता दोघेही आपला-आपल्या धर्म आणि संस्कृती सांभाळत संसार करत आहेत.