बेगूसराय - फ्रान्सच्या पॅरिसमधील (paris) एक तरुणी आपल्या भारतीय प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली. खरे तर, फ्रान्समधील मेरी लॉरी हर्लचे (Mary Lori Herl) बेगूसराय (Begusarai) येथील राकेश कुमारसोबत अफेअर होते. या दोघांनी रविवारी हिंदू पद्धतीने थाटात लग्न केले.
या जोडप्याचे लग्न झाल्यानंतर बिहारी 'वर' आणि परदेशी 'वधू' पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. लग्न आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारीही परदेशी वधू पाहण्यासाठी नातेवाईक व गावकरी घरी येतच होते.
बेगूसरायच्या कटहरिया येथील रहिवासी रामचंद्र साह यांचा मुलगा राकेश कुमार याने पॅरिसमधील व्यावसायिक मेरी लॉरी हर्ल हिच्याशी सनातन पद्धतीने लग्न केले. मेरीसोबत तिची आईही लग्नासाठी आली होती. वधू आणि वर पुढील आठवड्यात पॅरिसला परतणार आहेत.
राकेशचे वडील रामचंद्र साह यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा दिल्लीत राहून देशाच्या विविध भागांत टुरिस्ट गाईड म्हणून काम करत होता. यादरम्यान, सुमारे सहा वर्षांपूर्वी भारत भेटीवर आलेल्या मेरीसोबत त्याची मैत्री झाली. यानंतर भारतातून पुन्हा आपल्या देशात परतल्यानंतरही दोघांमधील संवाद सुरू होतो आणि या संवादाचेच नंतर प्रेमात केव्हा रुपांतर झाले हे कुणाला समजलेच नाही. यानंतर राकेशही तीन वर्षांपूर्वीच पॅरिसला गेला होता. तेथे राकेशने मेरीसोबत भागीदारी करून कापडाचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. यादरम्यान या दोघांचे प्रेम अधिकच घट्ट झाले.
या दोघांच्या प्रेमासंदर्भात मेरीच्या घरच्यांना जेव्हा समजले, तेव्हा त्यांनीही या नात्यासाठी होकार दर्शवला. मेरीला भारतीय सभ्यता आणि संस्कृती एवढी आवडली की, तिने भारतात येऊन होणाऱ्या पतीच्या गावात लग्न करण्याचा प्लॅन तयार केला. यानंतर मेरी तिचे आई-वडील आणि राकेश यांच्यासह गावात पोहोचली आणि येथे रविवारी रात्री भारतीय सनातन परंपरेनुसार वैदिक मंत्रोच्चारात दोघांचा विवाह पार पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेशचे मामाही गाईड म्हणून काम करायचे. त्यांचीही लव्हस्टोरी काहीशी अशीच आहे. तेही लग्न करून सध्या फ्रान्समध्येच राहतात.