भोपाळ - मध्य प्रदेशमधील बैतूल येथे एका दलित युवकाशी लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलीला तिच्या वडिलांनी नर्मदा नदीमध्ये स्नान करायला लावून शुद्धिकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनर किलिंगच्या भीतीने या जोडप्याने पोलिसांकडे आपल्या संरक्षणाची मागणी केली आहे. हा प्रकार बैतूल जिल्ह्यातील चोपाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. यामधील पीडित तरुणीने तिच्या वडिलांसह कुटुंबीयांपासून वाचवण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. तसेच पोलिसांनी वडिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बैतूलमधील चोपना येथील रहिवासी साक्षी यादव हिने बैतूलमधील अमित अहिरवार नावाच्या युवकाशी गतवर्षी आर्य समाज मंदिरामध्ये लग्न केले होते. लग्नानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने तिला सासरहून माहेरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला शिक्षणासाठी राजगड येथे पाठवले. सध्या ती हॉस्टेलमध्ये पाठवले. २८ ऑक्टोबरला ती हॉस्टेलमधून पळून पतीकडे बैतूल येथे पोहोचली.
या तरुणीचा आरोप आहे की, वडिलांनी १८ ऑगस्ट रोजी तिला नर्मदा नदीवर घेऊन गेले. तिथे चार जणांसमोर तिला अर्धनग्न करून तिचे शुद्धिकरण केले. नदीमध्ये स्नान करायला लावले आहे. त्यानंतर तिला उष्टे खायला दिले गेले. मग तिचे केस कापले गेले. त्यानंतर तिच्या शरीरावर असलेले कपडे फेकून दिले गेले. असे दलित युवकासोबत विवाह केल्यानंतर तिच्या शुद्धिकरणासाठी असे केले गेले.
आता तिने पतीला घटस्फोट देऊन कुठल्यातरी सजातीय व्यक्तीशी विवाहा करावा म्हणून तिच्यावर दबाव आणला जात आहे. दरम्यान, पोलिसांनीही आपल्या वडिलांशी हातमिळवणी केली आहे, असा आरोप तिने केला आहे.