हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या प्रतिबंधासाठी रशियातून आयात केलेल्या स्पुतनिक व्ही लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद मिळाल्याने सरकार आणि तज्ज्ञ चकित झाले आहेत. २२ मेपासून दोन टप्प्यांत ३२.१० लाख स्पुतनिक व्ही डोसची आयात करण्यात आली असली तरी ती घेण्यास लोकांत फारसा उत्साह दिसून आलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, २४,७१३ लोकांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे. १२ जूनपर्यंत तीन लसींचे मिळून २४.८८ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यात स्पुतनिक व्हीचा वाटा नगण्य ठरला आहे. स्पुतनिकचे महाराष्ट्रात ८३४ डोस, तर दिल्लीत ८६ डोस दिले गेले आहेत. जास्तीत जास्त डोस आंध्रप्रदेश आणि तेलंगणात दिले गेले आहेत. त्याखालोखाल प. बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो.
स्पुतनिक व्ही लसीची सर्व जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरॅटरीजकडे असून खाजगी रुग्णालये आणि संस्थांमधून ती दिली जात आहे. सरकारकडून केवळ कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन याच लसींची खरेदी केली जात आहे.
ऑगस्टपासून स्पुतनिक व्ही लसीचे भारतातच उत्पादन केले जाणार असून, वार्षिक ८५० दशलक्ष डोसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.स्पुतनिक व्ही ही लस उणे (-) २० सेंटिग्रेड तापमानात साठवून ठेवावी लागते. डॉ. रेड्डीजने ७५० संस्थांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ओपोलो हॉस्पिटलसोबत करार करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. स्पुतनिक व्हीच्या एका डोसची किंमत १,१४५ रुपये आहे.