नवी दिल्ली : मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या तपासाच्या कागदपत्रांमध्ये सत्य दडविण्यासाठी फेरफार केले गेले व काही कागदपत्रे बनावट तयार केली गेली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी यासाठी ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएशन’ने केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्या दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्पचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. दुष्यंत दवे यांनी हा आरोप केला. तपासाची सर्व मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर केली जावीत व न्यायमूर्तींनी ती तपासावीत, अशी मागणीही त्यांनी केली. यावर महाराष्ट्र सरकारतर्फे अॅड. मुकुल रोहटगी यांनी, सर्व मूळ कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असून, न्यायालयास हवी असतील तेव्हा ती दिली जातील, असे सांगितले. ही सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी पुढे सुरु राहणार आहे.न्या. लोया यांना इस्पितळात नेले तेव्हा त्यांच्यासोबत जे इतर चार न्यायाधीश होते, त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. त्यांच्या जबान्यांमधील तफावती व विरोधाभास याकडे लक्ष वेधून अॅड. दवे यांनी हे चौघे लोयांसोबत इस्पितळात गेले होते यावरही शंका घेतली.अॅड. इंदिरा जयसिंग यांनीही पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड असल्याचा मुद्दा मांडला. न्यायाधीशांच्या विधानांची शहानिशा करण्यासाठी हे न्यायाधीश मुक्कामाला असलेल्या नागपूरच्या रविभवन या सरकारी विश्रामगृहातील नोंदीही मागवाव्या, अशी त्यांनी मागणी केली.अॅड. दवे यांचा युक्तिवादाचा रोख पाहून न्यायाधीश त्यांना म्हणाले की, तुम्हाला जे काही महत्त्वाचे निदर्शनास आणायचे असेल ते आम्ही जरूर पाहू. परंतु एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगी कशी वागली यावरून तिच्या विधानांच्या खरेपणाची जोखणी करणे योग्य नाही. एखादी धक्कायादक घटना घडल्यावर प्रत्येक व्यक्ती अमूकच पद्धतीने वागायला हवी होती, असे म्हणता येणार नाही.लोया यांच्यासोबत चार न्यायाधीश इस्पितळात गेले होते तर त्यांच्या मृत्यूची नोंद पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये या चार न्यायाधीशांपैकी कोणाच्याही नावाने न नोंदविता लोया यांचे नातेवाईक डॉ. प्रशांत राठी यांच्या नावे का नोंदविली गेली, असा सवाल अॅड. दवे यांनी केला. लोया यांच्या मृत्यूविषयी त्यांच्या कुटुंबास अंधारात ठेवले गेले, असे दवे यांचे म्हणणे होते. त्यावर अॅड. रोहटगी म्हणाले की, इस्पितळात गेलेल्या एका न्यायाधीशाने त्या दिवशी पहाटे पाच वाचता फोन करून आपल्याला पतीच्या प्रकृतीची माहिती दिली होती, असे लोया यांच्या पत्नीने तपासात पोलिसांना सांगितले आहे.दवे यांनी लोया यांचा मृत्यू व सोहराबुद्दीन चकमक खटला यांचा अन्योन्य संबंध लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरन्यायाधीशांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, आमच्यापुढे फक्त लोया यांच्या मृत्यूचा विषय आहे.सोहराबुद्दीन बनावट पोलीस चौकशी खटल्याची सुनावणी लोया यांच्यापुढे सुरु होती. आता उच्च न्यायालयाच्या न्या. स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले असता हृदयविकाराचा झटका येऊन लोया यांचे १ डिसेंबर २०१४ रोजी निधान झाले. या खटल्यात भाजपाध्यक्ष अमित शहा हेही आरोपी होते. कालांतराने त्यांना आरोपमुक्त केले गेले.आणखी काही शंका व उत्तरेलोया यांना मंगेशकर इस्पितळात ननेता मेडिट्रिना इस्पितळात का नेले? पोलिसांच्या रेकॉर्डनुसार इस्पितळात नेण्याआधीच लोया यांचा मृत्यू झाला होता. पण मेडिट्रिना इस्पितळाच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्यावर काही चाचण्या केल्याच्या व त्याचे बिल आकारल्याच्या नोंदी आहेत. मृत्यू आधीच झाला होता तर चाचण्या कशासाठी?सरकारचे उत्तर असे की, एखादी व्यक्ती मृत झाल्याचे वाटल्याने तिला इस्पितळात आणल्यास तो देह थेट शवागारात पाठवत नाही. मृत्यू झालाची खात्री करण्यासाठी व पुनरुज्जीवित करणे शक्य असल्यास तसे प्रयत्न केले जातात. त्यासाठीच या चाचण्या केल्या.पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये सुरुवातीस सीताबर्डी पोलीस ठाण्याचे नाव आहे. नंतर हे प्रकरण सदर पोलीस ठाण्याने हाताळल्याची नोंद दिसते.सरकारचे उत्तर असे की, लोया यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ज्या इस्पितळात पाठविला गेला ते सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत होते. म्हणून नंतरची कागदपत्रे त्या पोलीस ठाण्याची आहेत.
लोया मृत्यू; कागदपत्रांमध्ये खाडाखोड, न्यायाधीशांच्या जबान्यांमध्येही विरोधाभास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:51 PM