ठळक मुद्दे भारतीय वन विभागातील सनदी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिद्दराजू यांच्या धाडसी कामाचा फोटो शेअर केला आहे.सिद्दराजू यांनी एका लोखंडी पिंजऱ्यात स्वत:ला बंद करुन घेतले. तसेच, आपल्या एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन ते विहिरीत उतरले.
बंगळुरू - कर्नाटकच्या नगरहोल राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील एका वन अधिकाऱ्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, एका आएफएस अधिकाऱ्यानेही त्यांच्या कामाचं कौतुक करताना, आपल्या कामाप्रती अशी निष्ठा असावी, असा संदेशच दिला आहे. सिद्धराजू नावाच्या वन अधिकाऱ्याने 100 फुटी खोल विहिरीत उतरुन बिबट्याचे प्राण वाचवले.
भारतीय वन विभागातील सनदी अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिद्दराजू यांच्या धाडसी कामाचा फोटो शेअर केला आहे. नगरहोल येथे रेंजर फॉरेस्ट ऑफिसर असलेल्या सिद्दराजू यांनी एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान दिलं. आपल्या जीवाची बाजी लावून ते एका पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीत उतरले होते. 100 फुट खोल असलेल्या या कोरड्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. त्याला वाचविण्यासाठी सिद्दराजू यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सिद्दराजू यांनी एका लोखंडी पिंजऱ्यात स्वत:ला बंद करुन घेतले. तसेच, आपल्या एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन ते विहिरीत उतरले. त्यानंतर, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला त्यांनी जीवनदान दिलं. या बिबट्याला बाहेर काढण्यात वन खात्याला यश आले. मात्र, आपल्या कामाप्रति निष्ठा व तळमळ सिद्दराजू यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचं सनदी अधिकारी परवीन कासवान (आयएफएश) यांनी म्हटलंय. कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील दोन फोटोही शेअर केले आहेत.