राजस्थानमधील डुंगरपूर येथील एका सरकारी शाळेत धक्कादायक घटना घडली. जवळपास 200 मुलं जेवत होती. त्यांच्यासाठी अन्न शिजवले जात होते. याच दरम्यान अचानक गॅस सिलिंडरला मोठी आग लागली. आग पाहताच शाळेत एकच गोंधळ उडाला. पोलिसांना आगीची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले हेडकॉन्स्टेबल गोविंद लबाना आणि चालक तुलसीराम यांनी प्रसंगावधान दाखवत जळता एलपीजी सिलिंडर शाळेच्या बाहेर फेकून दिला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, डुंगरपूरच्या ओबरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जादेला येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत सुमारे 200 शाळकरी मुलं पोषण आहार घेत होती. याच दरम्यान अचानक गॅस सिलिंडरला आग लागली. आग पाहून मुलं इकडे तिकडे धावू लागली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल गोविंद लबाना आणि चालक तुलसीराम तेथे पोहोचले.
शाळेतील एका खोलीत लागलेली आग वेगाने पसरत होती. जवळच आणखी दोन गॅस सिलिंडर देखील होते. मोठा धोका ओळखून दोन्ही पोलीस कर्मचारी ओला कपडा घेऊन आग लागलेल्या खोलीत घुसले आणि जळणारा गॅस सिलिंडर बाहेर काढून शेतात फेकून दिला. अशात दोन्ही पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
लोकांनी दोन्ही पोलिसांच्या धैर्याचे खूप कौतुक केले. शालेय विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या दोन्ही पोलिसांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आगीत शाळेतील खाद्यपदार्थ व संगणक कक्षाचे साहित्य जळून खाक झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"