नवी दिल्ली: सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी ८३४.५० रुपयांना मिळेल. आतापर्यंत हा सिलिंडर ८०९ रुपयांना मिळत होता. देशाच्या इतर भागांमध्येही सिलिंडरचे दर वाढले आहेत.
दिल्लीतही सिलिंडरचा दर ८३४.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आधी सिलिंडरसाठी ८०९ रुपये मोजावे लागायचे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी इंधन कंपन्या सिलिंडरच्या दरांबद्दल निर्णय घेतात. याआधी १ मे रोजी गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. एप्रिलमध्ये सिलिंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याआधी फेब्रुवारी, मार्चमध्ये सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.
मुंबईत गेल्या महिन्यात ८०९ रुपयांना मिळणारा १४.२ किलोचा सिलिंडर आता ८३४.५० रुपयांना मिळेल. कोलकात्यात याच सिलिंडरसाठी ८६१ रुपये मोजावे लागतील. आधी याच सिलिंडरची किंमत ८३५.५० रुपये इतकी होती. चेन्नईत आधी ८२५ रुपयांना मिळणारा सिलिंडर ८५०.५० रुपयांना मिळेल.
६ महिन्यांत १४० रुपयांची वाढ२०२१ च्या सुरुवातीला दिल्लीत सिलिंडरचा दर ६९४ रुपये होता. आता हाच दर ८३४.५० रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ ६ महिन्यांत सिलिंडरची किंमत १४० रुपयांना वाढली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिलिंडरची किंमत ८७२.५० रुपयांवर गेली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये सिलिंडरचा दर ८४१.५० रुपये झाला आहे.