नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. याच दरम्यान आता लोकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून 15 दिवसांत तब्बल 50 रुपयांनी महागला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.
दिल्लीमध्ये आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर 884.50 रुपये इतका झाला आहे. याआधी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. तर मे आणि जून महिन्यात सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. तसेच एप्रिलमध्ये सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.
दिल्लीमध्ये यावर्षात जानेवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरचा दर 694 रुपये होता, तो फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये इतका झाला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दर वाढवण्यात आल्याने सिलिंडरची किंमत 769 रुपये करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीमध्येच पुन्हा दुसऱ्यांदा वाढ झाली. 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडर 794 रुपये झाला. मार्चमध्ये दर वाढून 819 रुपये इतका झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.