नवी दिल्ली - जर तुम्ही नवीन गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी धक्का देणारी आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसच्या नव्या कनेक्शनच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. आधी गॅस सिलेंडरचं एक कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये द्यावे लागत. मात्र आता त्यामध्ये ७५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता त्यासाठी २२०० रुपये द्यावे लागतील.
पेट्रोलियम कंपन्यांकडून १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनवर प्रति सिलेंडर ७५० रुपयांची वाढ कऱण्यात आली आहे. जर तुम्हाला दोन सिलेंडरचं कनेक्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला १५०० रुपयांचा अतिरिक्त भरणा करावा लागेल. म्हणजेच तु््हाला त्यासाठी ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील. तत्पूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत. कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल १६ जूनपासून लागू होईल.
त्याचप्रमाणे रेग्युलेटरसाठी तु्म्हाला १५० रुपयांऐवजी २५० रुपये मोजावे लागतील. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले की, ५ किलो सिलेंडरची सिक्योरिटी आता ८०० ऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे.
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही नवे दर लागू झाल्याने धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्याकडील गॅस कनेक्शन डबल करायचं असेल तर दुसऱ्या सिलेंडरसाठी वाढलेली सिक्युरिटी रक्कम त्यांना जमा करावी लागेल. मात्र जर कुणाला नवं कनेक्शन मिळालं तर त्यांना सिलेंडरची सिक्युरिटी ही आधीप्रमाणेच मिळेल.
जर तुम्ही एक सिलेंडरचं नवं गॅस कनेक्शन घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला ३६९० रुपये मोजावे लागतील. जर तु्म्ही शेगडी घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला वेगळी रक्कम मोजावी लागेल. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींदरम्यान कनेक्शन महागल्याने लोकांना धक्का बसला आहे.