नवी दिल्ली - भारतात अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. 1 मे 2014 रोजी देशात घरगुती गॅसची किंमत 414 रुपये होती. तर, 1 मे 2019 रोजी या अनुदानित गॅसची किंमत 496.14 रुपये एवढी झाली आहे. मात्र, पाकिस्तानात घरगुती गॅसची किंमत भारतापेक्षा जास्त आहे. तसेच, श्रीलंका आणि भुतानमध्येही भारतापेक्षा गॅसच्या किमती अधिक आहेत.
देशात लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच अनुदानि गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली. अनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 25 तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 6 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 496.14 रुपये तर 14.2 किलोवाला विनाअनुदानित गॅस सिलेंडर 712.5 रुपयांना झाला आहे. त्यावरुन, विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरले होते. गेल्या 5 वर्षात अनुदानित गॅसच्या किमतीमध्ये 82 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरुन मिळालेल्या माहिती नुसार 1 मे 2014 साली गॅस सिलेंडरची किंमत 414 रुपये होती, ती सध्या 496 रुपये आहे.
पाकिस्तानमध्ये गॅसच्या किमती 1500 रुपये
भारताच्या तुलनेत श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये घरगुती गॅसच्या किमती अधिक आहेत. पाकिस्तानमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1522.65 रुपये एवढी आहे. पाकिस्तानच्या गॅस सिलेंडरमध्ये 11.8 किलो गॅस भरण्यात येतो. पाकिस्तानसह शेजारील राष्ट्रांमध्येही गॅसच्या किमती प्रति किलोच्या दराने ठरलेल्या असतात. त्यामुळे गॅस सिलेंडरमध्ये जेवढा गॅस तितकी रक्कम ग्राहकाला द्यावी लागते. पाकिस्तानात घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी महिन्यातच गॅसच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली. तर गेल्या मार्च महिन्यात 9 रुपये प्रति किलो दर वाढल्याने सिलेंडरची किंमत 1522.65 रुपये झाली आहे. पाकिस्ताननंतर श्रीलंकेतही घरगुती गॅसच्या किमती अधिक आहेत. येथे घरगुती गॅसमध्ये 12.5 किलो गॅस भरला जातो. सप्टेंबर 2018 नंतर वाढलेल्या किंमतीनुसार येथे गॅस सिलेंडरची किंमत 1733 रुपये एवढी आहे. तर नेपाळमध्ये 1400 आणि भुतानमध्ये 1393 रुपये प्रति सिलेंडर अशी किंमत आहे. चीनमध्ये सर्वात महाग सिलेंडर मिळत असून तेथे प्रति सिलेंडर भारतीय चलनानुसार 1820 रुपये एवढे आहे.