एलपीजीच्या (LPG) वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (Gas Cylinder ) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे. (LPG Gas cylinder price will increase soon)
चीनमध्ये कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे चीन सरकारने मिळेल तिथून नैसर्गिक गॅस आयात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात मोठी वाढ होत आहे, असे सांगितले जात आहे. यामुळे भारतात देखील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर हा 908.4 रुपयांच्या आसपास आहे. तर व्यावसायीक १९ किलोच्या गॅस सिलिंडरचा दर हा 1715.5 रुपये आहे. १ सप्टेंबरला शेवटची दरवाढ झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये हाच गॅस सिलिंडरचा दर 596 रुपये होता. गेल्या वर्षभरात यामध्ये ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सबसिडीही मिळत नसल्याने गृहीणींचे गणित बिघडले आहे.
शहरात मध्यम आणि गरीब रेषेखाली अनेक कुटुंबे राहतात. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी लाकडांवर जळणाऱ्या चुली वापरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या शहरी लोकांकडे महागडा गॅस सिलिंडर घेण्यापासून पर्याय राहिलेला नाही. घरगुती वापराच्या गॅस आणि सीएनजीमध्ये येत्या काळात १० ते २० टक्के दरवाढ होण्य़ाची शक्यता आहे. खासगी कंपन्यांकडून गॅस घेण्यासाठी सरकार सहा महिन्यांनी आढावा बैठक घेते, ती १ ऑक्टोबरला होणार आहे. नैसर्गिक गॅसला सीएनजी आणि पीएनजीमध्ये रुपांतरीत केले जाते. भारत आपल्या गरजेच्या ५० टक्के गॅस आयात करतो.