नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही वापरला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात पहिल्यांदा भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केलं असा दावा भाजपाकडून केला जात होता. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी मोदींसारख्या कणखर निर्णय घेणाऱ्या नेतृत्त्वाची गरज आहे असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं. मात्र काँग्रेस काळातही अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्या असा दावा विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यावर आता भारतीय लष्करी दलातील कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी खुलासा केला आहे.
भारतीय जवानांनी पहिल्यांदा 9 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटमध्ये एअर स्ट्राईककरुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले असं जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले. सोमवारी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे सांगितले. राजकीय पक्ष काय बोलतात यावर उत्तर देणार नाही. सरकार त्यांना उत्तर देईल मात्र आम्ही जे सांगतोय ते तथ्य आहे. सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय जवानांनी पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केलं होतं असं त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अनेकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइकचा उल्लेख केला होता. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं, असंदेखील मोदींनी अनेकदा म्हटलं. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. मात्र कधीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही, असं सिंग एका मुलाखतीत म्हटलं होतं.
यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत
मनमोहन सिंग यांच्या दाव्यानंतर काँग्रेसनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला होता.
मात्र लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी केलेल्या या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसच्या दाव्यावर प्रश्न उभा राहतो. तसेच मागील चार महिन्यात 86 दहशतवादांना ठार केले तर 20 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे अशीही माहिती जनरल रणबीर सिंह यांनी दिली.