अयोध्या - पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणाऱ्या मुहम्मद शरीफ यांचा अयोध्या जिल्ह्यात सन्मान करण्यात आला. प्रभारी मंत्री निलकंठ तिवारी आणि जिल्हाधिकारी अनुजकुमार यांनी अंगावर तिरंगा चढवत शरीफ यांचा सत्कार केला. यावेळी मोहम्मद चाचांच्या डोळ्यात अश्रू तरळले, वयाच्या 80 व्या वर्षीही आनंद साजरा करताना ते भावनाविभोर झाल्याचं पाहायला मिळालं.
अयोध्या येथील सन्मान सोहळ्यात बोलताना मोहम्मद चाचांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुल्तानपूर येथे 27 वर्षांपूर्वी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली होती. याबाबत तब्बल 1 महिन्यानंतर मला माहिती मिळाली. त्यानंतर, मी हे काम हाती घेतलं. आजपर्यंत 3 हजार हिंदू आणि 2500 मुस्लीम व्यक्तींच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम माझ्या हातून घडलं, असं मोहम्मद चाचांनी सांगितलं. सन 1993 मध्ये मोहम्मद चाचा यांचा मुलगा मोहम्मद रईस हा औषधे खरेदी करण्यासाठी गेला होता. मात्र, एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. याबाबत तब्बल 1 महिन्यानंतर मोहम्मद चाचांना माहिती मिळाली. गेल्या महिनाभर ते मुलाचा तपास करत होते. मात्र, पोलिसांनी रईसच्या कपड्यावरील टेलरचा शोध घेतला. तर, कपड्यावरुन मोहम्मद चाचा यांना रईसला ओळखले. मात्र, तोपर्यंत एक बेवारस पार्थिव म्हणून रईसवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मोहम्मद चाचांना या घटनेनं हादरा बसला. तेव्हापासून बेवारस मृतदेहांवर त्यांच्या धर्मानुसार रितीरीवाजाने अंत्यसंस्कार करण्याचं वचन त्यांनी घेतलं. त्यानुसार, आजपर्यंत 25 हजार बेवारस पार्थिव शरिरावर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. चाचांच्या या महान कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.