उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये कारमध्ये असलेल्या न्यायाधीशांच्या मुलाने मोठा गोंधळ घातला. न्यायाधीशांच्या मुलाची नो-पार्किंगमध्ये उभी असलेली कार वाहतूक पोलिसांनी उचलली. यावर न्यायाधीशांचा मुलगा संतप्त झाला आणि त्याने गैरवर्तन केलं. अखेर 1100 रुपये दंड भरून कार सोडण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लखनौच्या हजरतगंजमध्ये न्यायाधीशांच्या मुलाने नो-पार्किंगमध्ये उभी असलेली कार उचलल्याने मोठा गोंधळ घातला.
न्यायाधीशांच्या मुलाने कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. यासोबतच पोलीस ठाण्यात गेल्यावर मारण्याची धमकीही दिली. "पोलीस ठाण्यात मार खाशील तेव्हा कार सोडशील..." असं म्हटलं. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार हजरतगंज येथील नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. क्रेनमधून गाडी उचलण्यापूर्वी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी याची घोषणा केली की, ज्याची गाडी नो पार्किंगमध्ये उभी असेल, त्याने येथून न्यावी, अन्यथा क्रेनद्वारे टो करण्यात येईल.
2 मिनिटं वाहतूक पोलिसांनी घोषणा केली, मात्र वाहनमालक घटनास्थळी न आल्याने वाहतूक पोलिसांनी गाडी क्रेनच्या साह्याने टो करून यार्डात नेली. गाडी जागेवर नसल्याचे पाहून कार चालकाने आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. लोकांनी सांगितले की ट्रॅफिक पोलिसांनी कार नो पार्किंग झोनमधून नेली आहे.
ट्रॅफिक बूथ यार्डमध्ये न्यायाधीशांच्या मुलाने कर्मचाऱ्यांना ओळख दाखवून गोंधळ घातला आणि गाडीवर काय लिहिले आहे ते वाचण्यास सांगितले. मोठमोठ्याने ओरडू लागला. कार लगेचच जॅमरपासून मुक्त करून ताब्यात द्या, असं सांगितलं. असं केलं नाही तर पोलीस ठाण्यात नेऊन मारेन असंही म्हटलं.
वाहतूक कर्मचाऱ्यांनी ज्वाइंट कमिश्नर ऑफ पोलिसांशी बोलू असे सांगितले. त्यावर न्यायाधीशांच्या मुलाने आता त्यांना इथे आणणार का, असा सवाल केला. त्यावर वाहतूक कर्मचाऱ्याने मी त्यांचा नंबर देतो, बोलू, असे सांगितले. या वादानंतर अखेर 1100 रुपये दंड भरूनच गाडी सोडण्यात आली. हे वाहन मेरठमधील न्यायाधीशांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.