लखनौ-
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये बसपा आमदार राजूपाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येनंतर राज्य सरकारनं आता थेट इशारा दिला आहे. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात लक्ष टाकलं आहे आणि संपूर्ण माहिती घेतली आहे. ते म्हणाले की शनिवारी याप्रकरणी सदनात चर्चा झाली आणि याचा मास्टरमाईंड सध्या यूपीच्या बाहेर आहे. पण काही चिंतेची बाब नाही. आम्ही यूपीतील गुन्हेगार आणि माफियांना समूळ नष्ट करुन टाकू. तसंच समाजवादी पक्षानं गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा आरोप आदित्यनाथ यांनी यावेळी केला.
सपावर हल्ला करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, हे लोक गुन्हेगारीशिवाय काहीही करू शकत नाहीत. हे लोक गुन्हेगारांना संरक्षण देतात. मुख्यमंत्री योगी यांनी प्रयागराज घटनेवर सभागृहात शोक व्यक्त केला. एसपींवर निशाणा साधत ते म्हणाले की, हे लोक गुन्हेगारांना पोसतात. पण त्यांना समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करू. या घटनेचा सूत्रधार यूपी बाहेरील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना तिकीट देऊन आमदार, खासदार केलं गेलं असंही ते म्हणाले.
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीपीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनीही निवेदन दिलं आहे. ही घटना अत्यंत दु:खद असल्याचं त्यांनी सांगितलं. पण आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार, असं योगी म्हणाले.
राजुपाल हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार उमेश पाल याची शुक्रवारी सायंकाळी उशिरा राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उमेश पाल गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये उमेश पाल आणि त्याचा अंगरक्षत बंदूकधारी जवानाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या अंगरक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारचे धोरण व हेतू चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
विधानसभेत गरजले मुख्यमंत्रीप्रयागराजच्या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकार झीरो टॉलरेन्सच्या धोरणावर काम करत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी एसपींना सवाल केला. ज्या गुन्हेगारांनी ही घटना घडवली त्यांना समाजवादी पक्षाचा आश्रय नाही का? असा सवाल त्यांनी केला. 'सपा'ने त्यांना खासदार केले नाही का? ते म्हणाले की, हे लोक व्यावसायिक माफियांचे आश्रयदाते आहेत.