लखनऊ : पासपोर्ट सेवा केंद्रात धर्मावरुन अपमान करण्यात आल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. या महिलेनं ट्विट करुन याबद्दलची तक्रार पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडेही केली आहे. लखनऊमधील रतन स्क्वेअरमधील पासपोर्ट सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांनी धर्मावरुन अपमान केल्याचा महिलेचा आरोप आहे. दुसरीकडे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी पीयूष वर्मा यांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान हमीपत्र मागताना वाद झाल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणातील आरोपी पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्र यांची बदली करण्यात आली आहे.
लखनऊमध्ये राहणाऱ्या तन्वी सेठ यांनी 2007 मध्ये अनस सिद्दिकी यांच्याशी विवाह केला. त्यांना आता सहा वर्षांची मुलगी आहे. बुधवारी हे तिघेजण पासपोर्ट सेवा केंद्रात गेले होते. सुरुवातीच्या दोन (ए आणि बी) काऊंटरवर त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. मात्र तिसऱ्या काऊंटरवर पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्र यांनी धर्मावरुन अपमान केल्याचा आरोप तन्वी यांनी केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही अधिकाऱ्यांनीदेखील आपली खिल्ली उडवली, असा दावादेखील त्यांनी केला.
तन्वी सेठ काऊंटर सी-5 वर पोहोचताच परिस्थिती आणखी बिघडली. विकास मिश्र यांनी तन्वी यांची कागदपत्रं पाहिल्यावर मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले. त्यावेळी तन्वी यांचे पती अनस तिथे पोहोचले. पासपोर्ट हवा असेल, तर धर्म बदला, असा धक्कादायक सल्ला अनस यांना यावेळी देण्यात आला. याबद्दल अनस सिद्दिकी यांनी आक्षेप घेतला. यानंतर एपीओ विजय द्विवेदी यांनी संपूर्ण विभागातर्फ अनस आणि तन्वी यांची माफी मागितली. द्विवेदी यांनी दाम्पत्याला या घटनेची लेखी तक्रार करण्यास सांगितलं. याबद्दल तन्वी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्र्यांकडे मदत मागितली आहे.