नवी दिल्ली- काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील प्रभारी प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या पक्ष कार्यालयातील नेहरू भवनात त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर जवळपास 16 तास मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठका पूर्ण रात्रभर सुरू होत्या आणि पहाटे 5.30 वाजता त्या संपल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी निवडणूक लढवणार नाही, काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रियंका म्हणाल्या, माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणताही मुकाबला नाही. राहुल गांधीच मोदींना टक्कर देतील. जेव्हा प्रियंकांना मोदींशी दोन हात करणार का असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्या म्हणाल्या मी निवडणूक लढणार नाही. मोदींशी मी नव्हे, तर राहुल गांधी मुकाबला करतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
बैठकीत प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. कुठल्या कार्यकर्त्याने अधिक वेळ घेतल्यास त्याला तसा अधिक वेळही देण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींकडे विविध तक्रारी केल्या. तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात रायबरेली फॉर्म्युला लागू करण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. मात्र आता लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने संघटनेतील फेरबदल हे निवडणुकीनंतर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.