उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत उष्णतेने कहर केला आहे. बिहारमध्येही मान्सून दाखल झाला आहे, मात्र उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. बिहार आणि यूपीमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 100 जणांचा मृत्यू झाला आहे. बलिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत तीव्र उष्माघाताने 57 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच जणांचा 'उष्माघात'ने मृत्यू झाल्याचा दावा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी केला. त्याचवेळी बलियाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह म्हणाले की, उन्हाळ्यात मृत्यूचे प्रमाण वाढते. दरम्यान, या प्रकरणाबाबत शासनाने स्थापन केलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दोन सदस्यीय पथकाने रविवारपासून तपास सुरू केला आहे.
समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणाबाबत राज्य सरकारला घेरले आणि म्हटले की, राज्यात सरकार शिल्लक राहिलेले नाही. पीटीआयशी बोलताना बलियाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जयंत कुमार यांनी दावा केला की, बलिया जिल्ह्यात 'उष्माघाता'मुळे आतापर्यंत केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये नोंदवलेल्या तपशीलानुसार 40 टक्के लोकांचा मृत्यू तापाने तर 60 टक्के इतर आजारांनी झाला आहे.
जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, “जिल्हा रुग्णालयात रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. 15 बेडचा विस्तार करण्यात आला आहे. यासोबतच रुग्णालयातील खोल्यांमध्ये कुलर आणि एअर कंडिशनर बसविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.के.यादव म्हणाले की, 15 जून रोजी रुग्णालयात 154 रुग्ण दाखल होते, त्यापैकी 23 रुग्णांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. त्यांच्या मते, याशिवाय 16 जून रोजी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आणि 17 जून रोजी 11 रुग्णांचा मृत्यू झाला. बलियामध्ये सामान्यपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामध्ये 60 वर्षांवरील लोकांची संख्या जास्त आहे.
बलियाचे भाजप आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांचे अजब विधान केल्याचं समोर आले आहे. रविवारी एका शासकीय कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, उन्हाळ्यात मृत्यूचे प्रमाण वाढते आणि हे यापूर्वीही होत आले आहे आणि यावेळीच होत आहे असे नाही. सिंह म्हणाले की, जर मृत्यू होत असेल तर तो नैसर्गिकरित्या होत आहे आणि त्याचा संबंध केवळ उष्णतेशी जोडता कामा नये. येथे, बलियामध्ये तीव्र उष्णतेने मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असताना, सरकारने जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिवाकर सिंह यांना हटवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.