नवी दिल्ली - लखनौमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. एका महिलेने आपण देवी पार्वतीचा अवतार असल्याचं जाहीर करत भगवान शंकराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या ही महिला भारत-चीन सीमेजवळील (Indo-China Border) नाभिधांग या प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे राहत आहे. पोलिसांची एक टीम या महिलेला आणण्यासाठी गेली होती पण तिने परत येण्यास नकार दिला आहे. तसेच मी आत्महत्या करेन अशी धमकीही दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-चीन सीमेजवळील नाभिधांगच्या प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लखनौच्या एका महिलेने ते ठिकाण सोडण्यास नकार दिला आहे. आपण देवी पार्वतीचा अवतार असून, कैलास पर्वतावर राहणार्या भगवान शंकराशी लग्न करणार असल्याचा दावाही तिने केला आहे. सीमेजवळ बेकायदेशीरपणे राहणाऱ्या या महिलेला हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला निराश होऊन परतावं लागलं. मला इथून परत नेल्यास मी आत्महत्या करेन’ अशी धमकी महिलेनं पोलिसांना दिली होती.
"उत्तर प्रदेश येथील अलीगंज भागातील रहिवासी असलेली महिला धारचुलाच्या एसडीएमकडून 15 दिवसांची परवानगी घेऊन आईसोबत गुंजी येथे गेली होती. परंतु 25 मे रोजी तिची परवानगीची मुदत संपल्यानंतरही तिने प्रतिबंधित क्षेत्र सोडण्यास नकार दिला होता. या महिलेला प्रतिबंधित क्षेत्रातून परत आणण्यासाठी दोन उपनिरीक्षक आणि एका निरीक्षकाचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय पोलीस पथकाला धारचूला येथून पाठवण्यात आलं होतं, परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
महिलेला परत आणण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा वैद्यकीय कर्मचार्यांसह 12 सदस्यीय पोलिसांचं मोठे पथक पाठवण्याची योजना बनवली आहे. ही महिला मानसिकरित्या स्थिर नाही, कारण ती देवी पार्वतीचा अवतार असून ती भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी आली असल्याचा दावा करत आहे असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून सर्वत्र याची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.