लुधियाना :पंजाबमधील लुधियाना येथील सहायक पोलीस आयुक्तांची कोरोनाबरोबरची झुंज अपयशी ठरली. येथील एसपीएस रुग्णालयात शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 13 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. पंजाबमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
लुधियाना जिल्ह्यातील जनसंपर्क कार्यालयाने यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे, की 'लुधियानाच्या सहायक पोलीस आयुक्तांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. ते येथील एसपीएस रुग्णालयात उपचार घेत होते.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संपर्कात आलेले काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते.
मिळाली होती 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'ची परवानगी -एसीपींसाठी 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'चीही परवानगी मिळाली होती, असे समजते. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर लुधियानातील रुग्णालयात त्यांच्यावर या थेरपीने उपचार करण्यात येणार होते. यासाठी एक डोनरही उपलब्ध झाला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
संबंधित सहायक पोलीस आयुक्तांना 8 एप्रिलला प्रकृती खालावल्याने रुग्णालयात आणण्यात आले होते. 13 एप्रिलला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टर राजेश बग्गा यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या निधनाची पुष्टी केली आहे. मात्र त्यांना कोरोनाची लागण कशी झाले, हे अद्याप समजलेले नाही.