लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य काही गंभीर जखमी झाले होते. न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये हा स्फोट झाला होता. एका व्यक्तीचा मृतदेह बाथरूममध्ये मिळाला होता. दरम्यान, आता या स्फोटाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ब्लास्टमध्ये आरडीएक्सचा वापर झाल्याची माहिती पंजाब पोलिसांनी फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारावर दिली. न्यायालय परिसरात जो स्फोट झाला होता, त्यात तब्बल दोन किलो RDX चा वापर करण्यात आला होता असंही त्यांनी म्हटलं.
स्फोट झाल्यामुळे पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेले स्फोटक साहित्य वाहून गेलं. ज्या दिवशी न्यायालयात हा स्फोट झाला त्या दिवशी न्यायालयात संप सुरू होता, यामुळेच मोठी दुर्घटनाही टळली. दरम्यान, सीसीटीव्हीच्या पडताळणीत काही संशयित हल्लेखोरही दिसून आले आहेत. स्फोटामध्ये त्यांची भूमिका काय होती याची सध्या पडताळणी केली जात आहे. तपासादरम्यान स्फोट झालेल्या ठिकाणाहून एक मोबाइलदेखील मिळाला आहे. यामध्ये सिमकार्ड आणि डेटा कार्ड सुरू अवस्थेत सापडलंआहे.
मृत्यू झालेला निलंबित पोलीस या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव गगनदीप सिंगअसं होतं. तो एक निलंबित पोलीस कर्मचारी होता. ड्रग्स संबंधित एका प्रकरणात त्याला दोन वर्षांपूर्वी शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला २०१९ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. या घटनेची माहिती असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गगनदीपची याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सुटका करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?लुधियानाच्या जिल्हा न्यायालयात गुरुवारी झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते. यानंत पंजाब सरकारनं राज्यात हाय अलर्ट जारी केला होता. न्यायालय परिसरात झालेल्या स्फोटामुळे काही प्रमाणात नुकसानही झालं होतं, तसंच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचाही फुटल्या होत्या.