सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका गरोदर महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गरोदर महिला आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. 'दिल धडकने दो' सिनेमातील 'गर्ल्स लाइक टू स्विंग' या गाण्यावर दोघींनी ठेका धरत धम्माल उडवली आहे. सिनेमातील हे गाणं अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रावर चित्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या गरोदर महिलेनं डान्स करुन सर्वांना हैराण केले आहे. तिचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ही महिला पंजाबच्या लुधियानातील येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. गरोदर महिलेचा डान्स करताना व्हिडीओ हर्ष गोयंका यांनी ट्विट केला होता. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं महिलेनं त्यांना धन्यवाद म्हटले आणि आपण कोरिओग्राफर असल्याची माहिती तिनं ट्विट केली.
ट्विटमध्ये तिनं सांगितले की, गरोदर राहण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. माझे पहिलं बाळ ऑपरेशनद्वारे जन्माला आले. दुसऱ्यांदाही ऑपरेशन करण्याचाच निर्णय मी घेतला आहे. पण हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना सांगू इच्छिते की, गरोदरपणात तुम्ही डान्स करण्याचा प्रयोग करू नका. कारण मी कोरिओग्राफर आहे आणि गरोदरपणातही डान्स करण्याची मला सवयआहे. गरोदरपणादरम्यान डान्स करणे हा एक चांगला व्यायाम प्रकार मानला जातो. पण हा व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा''.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या डॉक्टरांविरोधात अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महिलेनं सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत नेटीझन्सचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.