पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विषारी वायूने ३० सेकंदांमध्येच लोकांचा तडफडून मृत्यू झाला. जे लोक बेशुद्ध होऊन रुग्णालयात दाखल झाले होते, त्यांनाही तेव्हा नेमकं काय घडलं हे आठवत नाही आहे. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी ते रुग्णालयात दाखल असल्याचे पाहिले. दुसरीकडे एनडीआरएफच्या एअर क्वालिटी सेंसरने या परिसरामध्ये हायड्रोजन सल्फाइडचं प्रमाण अधिक असल्याच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा गॅस एवढा घातक असतो की, त्याच्या संपर्कात ३० सेकंदाहून अधिक राहिल्यास माणसाचा मृत्यू होतो. वायूगळती झाल्यानंतर ग्यासपूरामध्ये तेच चित्र होते.
गॅसच्या प्रभावामुळे बेशुद्ध होऊन रुग्णालयात पोहोचलेल्या स्थानिक रहिवासी नितीन याने सांगितले की, श्वास गुदमरल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर तो एका दुकानामध्ये होता. तिथे एक महिलासुद्धा होती. मात्र ती आता कुठे आहे हे माहिती नाही. दोन्ही पीडित या दुर्घटनेतून सुदैवाने बचावले, त्यानंतर त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. हायड्रोजन सल्फाइड गॅस या भागात कसा पोहोचला हे कळलेलं नाही. मात्र या दुर्घटनेसाठी नाल्यामध्ये केमिकल सोडणारे कारखाने जबाबदार आहेत. नाल्यामध्ये केमिकल मिसळल्याने हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होण्याची शक्यता वाढते.
एका मीडिया रिपोर्टनुसार ग्यासपुरा परिसरामध्ये सुमारे ४० हून अधिक फॅक्टरींमध्ये अशा प्रकारच्या केमिकलचा लपूनछपून वापर करतात. बहुतांश कारखान्यांकडे वॉटर ट्रिटमेंट प्लँट नाही आहे. ही विषारी द्रवे गुपचूप नाल्यामध्ये सोडली जातात.
या कारखान्यांमधून रात्री १ वाजण्याच्या सुमारास रसायने नाल्यामध्ये सोडली जायची. ही रसायने दीड ते दोन तासांमध्ये बुढ्ढे नाल्यामध्ये पोहोचून शहराबाहेर जायची. मात्र रविवारी काही कारखान्यांनी हे रसायनयुक्त पाणी सकाळी साडे सहा वाजता सोडले. ही दुर्घटना त्यामुळेच घडली, असं सांगण्यात येत आहे.