तेलंगणात सत्तांतराचे वारे वाहू लागले असून विधानसभा निवडणुकांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस सतर्क झाली आहे.
हैदराबादमध्ये काही लग्झरी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व विजयी आमदारांना लगेच हॉटेलमध्ये हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडत असले, तरीही कोणताही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळी तयार नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.
तेलंगणा निवडणुकीच्या निकालांदरम्यान हैदराबादमधील ताजकृष्णा बाहेर अनेक लक्झरी बसेस दिसल्या. यावर प्रतिक्रिया देताना तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरण कुमार चामला म्हणाले की, केसीआर कसे काम करतात हे सर्वांना माहिती आहे. लोकांची दिशाभूल करणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे आजचे निकाल लक्षात घेऊन आम्हीही काही पावले उचलली आहेत. आजचा कल आणि निकाल पाहता आता अशा कोणत्याही कारवाईची गरज नाही. काँग्रेस किमान 80 जागा जिंकेल. सगळे ठीक आहे. आज आम्ही खूप आनंदी आहोत.
दुसरीकडे, तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी म्हणाले की, तेलंगणातील शहीदांच्या आशा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तेलंगणातील बीआरएसकडून सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत आघाडी घेतल्यानंतर ए. शहीद जवानांच्या आणि राज्यातील चार कोटी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असे रेवंत रेड्डी यांनी रविवारी सांगितले.
दरम्यान, वेगवेगळ्या एक्झिट पोल सर्व्हेनुसार, तेलंगणात केसीआर यांची सत्ता संपुष्टात येत असल्याचे दिसून आले होते. आज सकाळी निवडणूक निकाल हाती येत असताना काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर, बीआरएस दुसऱ्या क्रमांकावर असून गत निवडणुकीत केवळ १ जागा जिंकलेल्या भाजपलाही ८ ते १० जागांवर आघाडी असल्याचे दिसते. काँग्रेसच्या या आघाडीमुळे तेलंगणात काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.