काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी दिग्गज या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे राहुल गांधीच्या यात्रेची आता महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. तत्पूर्वी राहुल गांधींनी तेलंगणातील हैदराबाद येथे मंगळवारी यात्रेतून स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी, वडिलांच्या आठवणी जागवल्या, तर हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईचीही मायेनं भेट घेतली.
हैदराबाद विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुलाने २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. जातीवादातून होत असलेल्या अन्यायामुळे व्यथीत होऊन रोहितने हे टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी हैदराबादेत गेले, त्यावेळी रोहित वेमुलाच्या आईने त्यांची भेट घेतली. यावेळी, राहुल गांधीसमवेत काहीवेळ त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागही घेतला. राहुल गांधी या ट्विट करुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, रोहित वेमुला हे सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षातील माझे प्रतिक होत आणि राहतील. असे म्हटले. तसेच, रोहित यांच्या आईला भेटून एक धाडस मिळालं, मनाला शांतीही मिळाली, असेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधींनी हैदराबादच्या चारमिनार येथे तिरंगा फडकावला. यावेळी, वडिलांच्या सद्भावना यात्रेची आठवणही सांगितली. ३२ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी चारमिनार येथून सद्भभावना यात्रेची सुरुवात केली होती. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी जीवाचं बलिदान दिलं. सद्भावना मानवतेचा सर्वात अनुपम मुल्य आहे. मी या मुल्याला तुटू देणार नाही, असेही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
रोहित वेमुला कोण होता?
हैदराबाद विद्यापीठाने २०१५ मध्ये ५ विद्यार्थ्याना वसतिगृहाबाहेर काढले. या दलित म्हणवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ कँपसमधील सार्वजनिक जागांवर जाण्यासही मनाई करण्यात आली. त्यांना लेक्चर अटेंड करण्याची आणि आपलं संशोधन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका विद्यार्थी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी या पाच जणांना ही शिक्षा करण्यात आली होती. यापैकी रोहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ रोजी वसतिगृहातल्या खोलीत आत्महत्या केली. वेमुलावर झालेली विद्यापीठ प्रशासनाची कथित सूडात्मक कारवाई आणि नंतर त्याने केलेल्या आत्महत्येने देशभरात राजकीय खळबळ माजली.
कन्याकुमारीपासून निघालेली ही ‘भारत जोडाे’ यात्रा तेलंगणात पोहोचली आहे. यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाची माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार हे ८ नोव्हेंबर राेजी नांदेडात मुक्कामी असतील आणि ९ नोव्हेंबर रोजी ते नायगाव येथून यात्रेत सहभागी होतील. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी सहभागी होणार आहेत.