ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चिनने दरवेळी विरोध केला . मात्र, आता मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं यासाठी भारताला फ्रान्सचं समर्थन मिळालं आहे.
'अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे आहेत' असं फ्रान्सनं म्हटलं आहे. दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदयाचा निर्धार एक असणं आवश्यक आहे असं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्यां मार्क ऐहू यांनी चिनचं नाव न घेता म्हटलं आहे. ते चार दिवसांच्या भारत दौ-यावर आले होते. जैश ए मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी संघटनेच्या यादीत समावेश झाला आहे. भारताच्या मागणीनुसार या संघटनेच्या प्रमुखाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी ठोस पुरावे आहेत. म्हणूनच यासाठी फ्रान्सने केवळ समर्थन दिलं नाही तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या आग्रहाखातर अजहरविरोधात आवाजही उठवला होता. भारताला आमचं समर्थन आहे हे भारताला माहिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काय करावं यासाठी फ्रान्स भारतासोबत चर्चा करेल, असं ते म्हणाले.
भारताने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, यानंतर दोन वेळेस चिनने भारताच्या प्रस्तावावर आडकाठी आणली .