नवी दिल्ली - काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधीचे पोस्टर्स झळकले आहेत. प्रियंका गांधींच्या विरोधात स्थानिकांकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर इमोशनल ब्लॅकमेकर आणि प्रियंका लापता असे लिहिण्यात आले आहे. रायबेरीला हा खासदार आणि प्रियंका यांच्या मातोश्री रायबरेली यांचा मतदारसंघ आहे.
उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघात एका रात्रीत झळकलेल्या या पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रियंका यांच्या शेवटच्या दौऱ्यानंतर रायबरेली अनेक दुर्घटना घडल्या. मात्र, काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला भेट देणेही प्रियंका यांना जमले नाही. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यानंतर किंवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रायबेरली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे प्रियंका यांचे नाव पुढे येत आहे. तरीही, प्रियंका यांचे या मतदारसंघाकडे असलेलं दुर्लक्ष पाहाता, स्थानिकांनी त्यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स झळकावले आहेत.
'अँखिया थक गयी पंथ निहार, आजा रे परदेशी बस एक बार', असे म्हणत प्रियंका यांना टार्गेट करण्यात आले आहे. प्रियंका या केवळ मतं मिळविण्यासाठी रायबरेलीतील लोकांच्या भावनांशी खेळतात, असा आरोप करत रायबरेलीत कधी येणार ? असा प्रश्नही या पोस्टर्सच्या माध्यमातून स्थानिकांनी विचारला आहे. या पोस्टर्संना शहरातील प्रमुख मार्गांवर, स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरील भींतींवर चिकटवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी या पोस्टरबाजी करणाऱ्यांना 'गंदी हरकत' असे संबोधले आहे. तसेच ही पोस्टरबाजी म्हणजे विरोधकांचे कटूकारस्थान असल्याचेही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.