ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला 'मेक इन इंडिया'चा नारा खरा होताना दिसत असून लवकरच जगप्रसिद्ध 'अॅपल आयफोन'चीही भारतात निर्मिती सुरू होणार आहे. आयटी हब नावाने ओळखल्या जाणा-या कर्नाटकमधील बंगळुरू येथे 'अॅपल'चे युनिट सुरू होणार असून कर्नाटक सरकारने गुरूवारी यासंबंधीचे एक पत्रक जाहीर करत ' अॅपल'चे स्वागत केले आहे.
कर्नाटकमधी माहिती-तंत्रज्ञान मंत्री प्रियंक खर्गे यांची स्वाक्षरी असलेले पत्रक जाहीर झाले आहे. ' अॅपल कंपनी बंगळुरूत युनिट सुरू करू इच्छिते. यामुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन विकसित होईल, जे जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतासाठी अत्यावश्यक आहे' असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान हे युनिट नेमके कदी सुरू होणार याची तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाली नसली तरी जूनपर्यंत उत्पादन सुरू होईल, असे समजते.
या युनिटमुळे 'आयफोन' असेंबल करणारा भारत जगातील तिसरा देश ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि नामांकित कपंनी असणा-या 'अॅपल'साठीही भारताचे किती महत्व आहे, हे यावरून दिसून येते. या युनिट उभारणीसाठी राज्य मंत्री आणइ अधिका-यांनी 'अॅपल' कंपनीच्या विविध अधिका-यांची भेट घेऊन चर्चा केली होती, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान अॅपलच्या भारतातील युनिट उभारणीसाठीच्या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांचाही समावेश होता, मात्र अखेर कर्नाटकने त्यात बाजी मारली आहे.