मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ओवेसींचा चांगलाच समाचार घेतला आहे. ओवेसी जर वाट्याची भाषा करत असतील तर तो 1947 मध्येच दिला आहे. असे भंडारी म्हणाले.
भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी ओवेसींवर निशाना साधला आहे. ओवेसी यांनी विचार करून बोलले पाहिजे. त्यांना कोणीही भाडेकरू म्हटलेलं नाही. तरीही ते वाट्याची भाषा करत असतील तर तो 1947 मध्येच दिला असून तो विषय संपला आहे. असे भंडारी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही. मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरमध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात असे, ओवेसी म्हणाले होते. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ही ओवेसी म्हणाले होते. त्यावर पलटवार करत, काही लोकांना आपली उपजीविका भागवण्यासाठी अनावश्यक बडबड करण्याची सवयी असते. असे भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणाले होते.