नवी दिल्ली : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांना गृह मंत्रालयाने वाय प्लस ( Y+) दर्जाची सुरक्षा दिली आहे. माधवी लता हैदराबादमधूनअसदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आयबीच्या धमकीच्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने माधवी लता यांना सुरक्षा दिली आहे.
वाय-प्लस कॅटगरीमध्ये सशस्त्र पोलिसांचे 11 कमांडो तैनात असतात, त्यापैकी पाच सॅस्टिक पोलिस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी व्हीआयपींच्या घरात आणि आसपास राहतात. तसेच, सहा पीएसओ संबंधित व्हीआयपींना तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने माधवी लता यांना हैदराबादमधून एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.
तेव्हापासून माधवी लता प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. त्यांना कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानला जातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. हैदराबाद हा एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी 1984 पासून ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन यांनी 1984 मध्ये पहिल्यांदा या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. ते या जागेवरून 20 वर्षे खासदार होते. यानंतर असदुद्दीन ओवेसी या जागेवर नेतृत्व करत आहेत.
यंदाच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात माधवी लता मैदानात उतरल्या आहेत. असदुद्दीन ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून पराभूत करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाला यावेळी हिंदुत्वाचा चेहरा सापडला आहे. दरम्यान, माधवी लता या व्यवसायाने डॉक्टर आहेत. विंरिंची नावाचे हॉस्पिटल देखील चालवतात. सोशल मीडियावर त्या आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत असतात. तसेच, माधवी लता या एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहेत.