संपूर्ण देशभरात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातही आजच मतदान होत आहे. सकाळच्या सुमारास भाजप उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्या बुरखा परिधान केलेल्या मुस्लिम महिलांची ओळख तपासताना दिसत आहेत. ओळखपत्र बघून त्या एका महिलेला म्हणत आहेत की, ही तर 38 ची आहे, तुम्ही 38 वर्षांच्या कुठे आहात? तुम्ही उचला (बुरखा वर करण्याचा संकेत देत). यानंतर संबंधित महिला पुन्हा बुरखा वर करते. यावरून वाद निर्माण झाला आहे.
यानंतर, माधवी लता यांनी खुलासा करताना म्हटले आहे, आपण विनंम्रपणे बोलत होतो आणि हा आपला अधिकार आहे. याप्रकरणी, दुपारी माधवी लता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 171 सी, 186, 505 (1) सी अंतर्गत मलकपेटमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये, एका दुसऱ्या महिलेला माधवी लता म्हणत आहेत (आय-कार्ड बघत) हे कोण, तुम्ही कोण? तुमचे आधार कार्ड दाखवा. यावेळी माधवी लता यांच्या बाजूला कदाचित एक मतदान कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचाही दिसत आहे. खरे तर, हैदराबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. हा मतदारसंघ जवळपास गेल्या चार दशकांपासून ओवेसी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या हिंदुत्ववादी उमेदवार माधवी लता यांनी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत झोकून दिली आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनीही येथे माधवी लता यांचा प्रचार केला आहे.
आणखी एका व्हिडिओमध्ये माधवी लता बनावट ओळपत्रांसंदर्भात बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एका कर्मचाऱ्यावर लेखी कारवाई करण्याचा इशाराही दिला. तसेच आपल्या एजंट्सनाही खोटी ओळख आढळल्यास आक्षेप नोंदवायला सांगत आहेत.
माधवी लता काय म्हणाल्या? -वाद वाढल्यानंतर, भाजपच्या उमेदवार माधवी लता म्हणाल्या, 'मी उमेदवार आहे. कायद्याप्रमाणे, उमेदवाराला फेस मास्कशिवाय ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. मी पुरूष नाही, मी एक महिला आहे आणि मोठ्या नम्रतेने मी त्यांना केवळ विनंती केली आहे. जर कुणी हा मोठा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर याचा अर्थ ते घाबरले आहेत.'