नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना कोळसा खाण वाटप घोटाळ्यात जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी २२ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली.न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) म्हणणे मागितले आहे. मात्र कोडा यांना देश सोडून जाता येणार नाही, असे आदेश दिले. या वेळी कोडा न्यायालयात उपस्थित होते.कोलकाता येथील विनी आयर्न अॅण्ड स्टील उद्योग लिमिटेडला (विसूल) झारखंडमधील कोळसा खाण वाटप करताना भ्रष्टाचार आणि कट रचला अशा खटल्यात कोडा दोषी सिद्ध झाले आहेत. या प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने दाखल करून घेतले आहे. मला दोषी ठरवण्याचा जिल्हा न्यायालयाचा निवाडा हा चुकीचा असल्याचे कोडा यांनी अपिलात म्हटले आहे.कोडा यांच्या अपिलाला आणि दंडाला दिल्या गेलेल्या स्थगितीला सीबीआयच्या वकील तर्रनुम चीमा यांनी विरोध केला. परंतु सीबीआयने त्यांच्या हंगामी जामिनाला विरोध केला नाही. या खटल्यात विसूलला ठोठावण्यात आलेल्या ५० लाख रुपये दंडाला उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली.
मधू कोडा यांच्या शिक्षेला हायकोर्टाने दिली स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:22 AM