ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ - प्रसिद्ध मॉडेल मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांची १९९५ साली प्रिंट मिडीयामध्ये प्रसिद्ध झालेली एक जाहीरात प्रचंड वादग्रस्त ठरली होती. या जाहीरातीमध्ये मधू आणि मिलिंद यांनी न्यूड पोझ दिली होती. त्यांच्या पायात बूट होते आणि त्यांच्या विवस्त्रशरीराभोवती अजगराने वेटोळे घातल्याचे या जाहीरातीत दाखवण्यात आले होते.
मुंबई पोलिसांनी दोघांच्या विरोधात अश्लीलतेचा गुन्हा नोंदवला होता. त्याबरोबरच वन्यजीव सुरक्षा कायद्यातंर्गतही गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी फक्त दहा वर्षांच्या असणा-या अनिरुद्ध सेनला ही जाहीरात फार आवडली होती. त्यातील न्यूडीटी किंवा सापांमुळे नव्हे तर, त्यातून सौदर्याचे जे दर्शन घडले होते ते अनिरुद्धला प्रचंड आवडले होते.
आता दोन दशकानंतर अनिरुद्धने पुन्हा तसाच साप आणि मॉडेलचा छायाचित्रांसाठी केलेला प्रयोग त्याला चांगलाच महाग पडला आहे. त्याच्यावर वनखात्याने गुन्हा नोंदवला आहे. अनिरुद्ध पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर असून पार्ट टाईम फोटोग्राफर आहे.
अनिरुद्धने जिवंत साप न्यूड मॉडेलबरोबर छायाचित्र काढण्यासाठी वापरले आणि ते फोटो फेसबुकवर अपलोड केले. वन्यजीव सुरक्षा कायदा १९७२ नुसार वन्य प्राण्यांना मारहाण आणि व्यावसायिक उद्देशासाठी त्यांना वापरण्यास मनाई आहे. त्यामुळे अनिरुद्ध विरोधात कारवाई सुरु झाली आहे.
बंगाल वन खात्याने प्रथमच छायाचित्रकारा विरोधात अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला आहे. सेन शिवाय त्याचा सहाय्यक, मॉडेल आणि मेकअप कलाकाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राण्यांच्या माणसासोबतच्या फोटोग्राफीला मनाई आहे हे मला माहित नव्हते असे आपला बचाव करताना अनिरुद्धने सांगितले.