नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपण नेहमीच चित्रपटात अथवा मालिकेत प्रेम कहाणी पाहत असतो. नायकाचा अथवा नायिकेचा मृत्यू झाला की त्याच्या विरहात जोडीदाराचादेखील मृत्यू झाल्याच्या घटना ऐकतो. पण अशीच एक घटना खऱ्या आयुष्यात देखील घडली आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच तिच्या पतीचा देखील मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या तासाभरात पतीनेही आपला जीव सोडला आहे.
अवघ्या काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच एकाच चितेवर दोघांना देखील मुखाग्नी देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या ग्यारसपूर येथील मनोरा या गावात ही घटना घडली आहे. येथील एका 95 वर्षीय महिलेचा दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एका तासातच पतीचा देखील मृत्यू आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी 100 वर्षीय प्रताप सिंह आणि त्यांच्या 95 वर्षीय धर्मपत्नी प्रसादीबाई यांच्यातील अतूट प्रेमाचं नातं पाहून नातेवाईकांनी त्यांना एकत्र मुखाग्नी दिला आहे.
घरातील वयोवृद्धांचा एकाचं दिवशी मृत्यू नातेवाईकांसह गावकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. प्रताप सिंह अहिरवार यांचा मुलगा अमरसिंह याने आज तकला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 95 वर्षांची आई प्रसादीबाई अहिरवार आणि त्यांचे वडील प्रताप सिंह नेहमी एकत्र असायचे. त्याच्या वडिलांचे दोन विवाह झाले होते. ही त्याची पहिली पत्नी होती, तर दुसरी पत्नी जिवंत आहे. या वयोवृद्धांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. याच दरम्यान आईचं अचानक निधन झालं आहे.
घरामध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. सर्व नातेवाईक घरी आले होते, आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच 1 तासानंतर वडिलांचंही अचानक निधन झालं. त्यामुळे दोघांची एकत्रच अंत्ययात्रा काढण्यात आली आणि एकत्रच अंत्यसंस्कार देखील केले गेले असल्याची माहिती मुलाने दिली आहे. पती-पत्नीचं एकमेकांवर असलेलं पाहून सर्वच जण भावूक झाले आहेत. नातेवाईकांनी देखील हे दोघेही नेहमी एकत्रच असल्याचं म्हटलं आहे. बाहेर फिरायला जाताना देखील कायम सोबत असत असं म्हटलं आहं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.