मध्यप्रदेश : विषारी दारूचे एकूण बळी २०; राजस्थानात चार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 05:32 AM2021-01-14T05:32:13+5:302021-01-14T05:32:26+5:30
दारू दुर्घटनेची गंभीर दखल घेत चौहान यांनी बुधवारी परिस्थितीचा आढावा घेत मोरेनाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून दूर करण्याचे आदेश दिले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
भोपाळ-मोरेना (मध्य प्रदेश) : मोरेना जिल्ह्यात विषारी दारू प्याल्याने आणखी सहा जण मरण पावल्यामुळे एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या २०वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून दूर करण्याचे आदेश काढले व चौकशीसाठी उच्च पातळीवरील समिती स्थापन करण्यास सांगितले. मोरेना आणि ग्वॉल्हेरमध्ये सध्या २१ जणांवर उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटले की, शवविच्छेदनाच्या प्रारंभीच्या अहवालात अतिदारू प्याल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अतिदारूने शरीराच्या महत्त्वाच्या अंगांची हानी झाली.
दारू दुर्घटनेची गंभीर दखल घेत चौहान यांनी बुधवारी परिस्थितीचा आढावा घेत मोरेनाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून दूर करण्याचे आदेश दिले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राजेश राजोरा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती या घटनेच्या वेगवेगळ्या अंगांनी तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मानपूर आणि पाहावाली खेड्यांतील काही रहिवाशांनी पांढऱ्या रंगाची दारू प्याली होती. राजस्थानमध्ये भरतपूर येथील रूपवास ठाण्याच्या हद्दीत बुधवारी विषारी दारू पिल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण आजारी पडले.