ऑनलाइन लोकमत
झाबुआ (मध्य प्रदेश), दि. १२ - येथील हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८२ वर पोचला असून ७० जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. सिलिंडरच्या स्फोटामुळे बसलेल्या हाद-याने या हॉटेलचे छत कोसळले आणि त्यामुळे सकाळी न्याहारीसाठी मोठ्या संख्येने आलेल्या ग्राहकांवर आपत्ती ओढवली. स्थानिकांच्या सांगण्यानुसार या इमारतीत राजेंद्र तातवा यांचं दुकान असून, ते स्फोटक पदार्थ बाळगण्याचे परवानाधारक आहेत. स्फोट झाल्यानंतर या स्फोटकांचाही भडका उडाल्याची व अपघाताची तीव्रता वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सिलिंडरचा स्फोट, त्यात स्फोटक पदार्थांची भर व छत कोसळून झालेली हानी यामुळे ८२ जण ठार झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच ढिगा-याखाली आणखी काहीजण अडकले असल्याचीही शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमींच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.