भोपाळ - मॅगी खाल्ल्यामुळे नऊ मुलांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील शनिवारी (7 जुलै)रात्री ही घटना घडली आहे. प्रकृती बिघडलेल्या नऊ मुलांना ग्वालियर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे मॅगीच्या गुणवत्तेबाबत पुन्हा शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी मॅगी नूडल्स आरोग्यास अपायकारक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 2015 मध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. 'अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन' (एफएसडीए) या संस्थेने गोळा केलेल्या मॅगीच्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे (लेड) आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळून आले होते.
यामुळे देशभरातून मॅगीच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अनेक राज्यांमधून मॅगीचे नमुने गोळा करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा 17 टक्के अधिक शिसे आढळले होते. रक्तामध्ये शिसेचे प्रमाण अधिक आढळल्यास कॅन्सर, मेंदूचे विकार, किडनीचे आजार होण्याची शक्यता असते. काही प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील ओढावतो. शिवाय, लहान मुलांच्या डोक्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते.