नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत 2899 उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये 2644 पुरुष, 250 महिला आणि 5 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशात एकूण 5,04,95,251 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला आणि 1389 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, बालाघाट जिल्ह्यातील तीन नक्षलप्रभावित विधानसभा मतदारसंघातील परसवाडा, बेहर आणि लांजी येथे सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे.
दुसरीकडे, मिझोरमध्ये 40 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये आठ राजकीय पक्षांचे एकूण 209 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण 7,70,395 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 374,496 पुरुष, 3,94,897 महिला मतदारांचा समावेश आहे.