भोपाळ- मध्य प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसनं स्वतःच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 29 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी काँग्रेसनं मंगळवारी तिसरी यादी जाहीर केली होती, ज्यात 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा होती. तर दुस-या यादीत 16 आणि पहिल्या यादीत 155 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. अशाच प्रकारे काँग्रेसनं मध्य प्रदेश निवडणुकीसाठी एकूण 231 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.काँग्रेसनं जाहीर केलेल्या चौथ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मेहुणा संजय सिंह याला वारसिवनी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तर इतर दोन उमेदवारांचे मतदारसंघ बदलण्यात आले आहेत. बुधवारी जारी करण्यात आलेल्या नावांमध्ये एकूण 29 नावांचा समावेश आहे. काँग्रेसकडून अजून 22 नावांची घोषणा करण्याचं बाकी आहे. काँग्रेस उद्या त्या 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ यांच्या बाजूने लॉबिंग सुरू केले. यावेळी संजय सिंह म्हणाले, मध्य प्रदेशात आता शिवराज नाही तर कमलनाथ यांची गरज आहे. शिवराज यांचे राज्य भरपूर झाले. त्यांनी 13 वर्षे सत्ता सांभाळली. आता कमलनाथ यांना ती सत्ता मिळाली पाहिजे.मध्य प्रदेशात गुंतवणूकदारांच्या अनेक बैठकी झाल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहेत. कमलनाथ यांनी छिंदवाडा भागात केलेली विकास कामे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील जनता कमलनाथ यांची वाट पाहत आहेत, असेही संजय सिंह यांनी सांगितले. याचबरोबर, ज्याप्रकारे भाजपामध्ये निष्ठेने सेवा केली. त्याच भावनेने संजय सिंह काँग्रेसमध्ये करतील, असे कमलनाथ यांनी सांगितले.
Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 10:07 PM