छतरपूरः मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्याला 'इमोशनल टच' दिला. 'माझ्याशी थेट भिडण्याची हिंमत नसल्यानं काँग्रेसचे नेते माझ्या आईला राजकारणात खेचत आहेत. जिला राजकारणातला 'र'ही ठाऊक नाही, जी पूजा-पाठ करण्यात - देवाचं स्मरण करण्यात रमली आहे, तिचं नाव खराब का करता?', असा भावनिक सवाल करत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
शिवराज सिंह यांना शिव्या घालण्याआधी काँग्रेसनं बोफोर्स प्रकरणातील क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेतील अँडरसन 'मामा'ला आठवावं, असा टोलाही मोदींनी लगावला.
राज बब्बर यांनी केला होता मोदींच्या आईचा उल्लेख...
इंदूरमध्ये गुरुवारी काँग्रेसची जाहीर सभा झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी 'अशुभ' असल्याची टिप्पणी काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केली होती आणि मोदींच्या आईलाही राजकारणात खेचलं होतं. 'डॉलरच्या तुलनेत रुपया इतका पडतोय की तो पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंह) वयाच्या जवळ पोहोचला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी करायचे. पण, आता तर रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय, असं विधान राज बब्बर यांनी केलं होतं. त्यावरून मोदींनी त्यांचे कान टोचले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यावरील टीकेचाही पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला. शिवराज यांना जनता 'मामा' म्हणते, याचाही काँग्रेसला त्रास होतो. पण, त्यांना नावं ठेवण्याआधी काँग्रेसनं आपल्या दोन मामांना आठवल्यास बरं होईल. ज्यांना देशाच्या सुरक्षेसाठीचा पैसा उधळण्याचं परमिट दिलं होतं आणि नंतर विशेष विमानाने अमेरिकेला पोहोचवलं, ते क्वात्रोची मामा काँग्रेसने आठवावेत. तसंच, भोपाळ गॅस दुर्घटनेतील मृत्यूला जबाबदार ठरलेल्या अँडरसन मामांनाही त्यांनी आठवावं. त्यांनाही काँग्रेसनेच गुपचूप विदेशात पोहोचवलं होतं, असा चपराक मोदींनी लगावली.