भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी लढत सुरू असल्याने राज्यात त्रिशंकू निकालांचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवार पाच ठिकाणी आघाडीवर असल्याने सत्तेच्या चाव्या मायावतींच्या हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बसपाचे मध्य प्रदेशमधील आमदार कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाहीत, अशी घोषणा मायावती यांनी केली आहे.
भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, मायावती यांच्या बसपानेही महत्त्वपूर्ण अशा पाच जागांवर आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 109 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 110 जागांवर आघाडीवर आहे. तसेच बसपा व इतर पक्ष मिळून 11 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे.