भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच जोर आता वाढू लागला असून, नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीहीमध्य प्रदेशात आक्रमकपणे प्रचार करत आहेत. मात्र प्रचारादरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेले शिवराज सिंह यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राहुल गांधींविरोधात मंगळवारी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्सशी जोडल्याने राहुल गांधींवर टीका होत आहे. दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण कन्फ्युज झाल्याने शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण दिले होते. "मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात होतो. खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव केली.सोमवारी राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहानांवर हे आरोप केले होते. मामाजींच्या मुलाचं पनामा पेपर्स घोटाळ्यात नाव समोर आले, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होते. पाकिस्तानसारख्या देशाने त्यांना तुरुंगात डांबले, परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. दरम्यान, राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. "जर कुणी कनिष्ठ नेत्याने असा आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण खुद्द काँग्रेस अध्यक्षानीच अशाप्रकारचे आरोप लावणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.