भोपाळ- भाजपानं मध्य प्रदेशमधून निवडणुकीच्या प्रचाराला एक प्रकारे सुरुवात केली आहे. महाकुंभ मेळाव्यातूननरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी कार्यकर्त्यांत उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला आहे. हा भाजपाचा सर्वात मोठा मेळावा असल्याचा दावा मोदींनी केला आहे. यावेळी मोदींनी अमित शाहांच्या कामाचं कौतुकही केलं. मोदी म्हणाले, भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याचा गर्व आहे. स्वातंत्र्यानंतरही देश तीन महापुरुषांना कधीही विसरणार नाही, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन हे एक प्रेरणा आहे. आम्ही सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो. मतांच्या राजकारणामुळे देशाचं 70 वर्षांत नुकसान झालं.जेव्हा दिल्लीत यूपीएचं सरकार होतं. तेव्हा ज्या राज्यांत भाजपा सरकारं होती, त्या राज्यांतील जनतेला काँग्रेस शत्रू समजत होती. 10-10 वर्षं ज्यांनी मध्य प्रदेश राज्याला शत्रू समजलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. काही लोकांनी मध्य प्रदेशला कायम प्रगतीपासून दूर ठेवलं. ज्या पक्षानं देशावर 50 ते 60 वर्षं शासन केलं, त्यांना मायक्रोस्कोप लावून आता शोधावं लागतंय. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या अहंकारानंच त्यांचा पराभव केला आहे. खुर्चीवर काही जण स्वतः वडिलोपार्जित हक्क समजतात.आतासुद्धा काँग्रेस छोट्या छोट्या पक्षांच्या पाया पडत आहे. जर वेळीच काँग्रेस नेत्यांनी आत्मचिंतन केलं असतं तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती. आम्ही पैशानं नव्हे, तर जनतेच्या ताकदीनं निवडणुका लढतो. कार्यकर्त्यांनी माझं बूथ सर्वात मजबूत या उद्देशानं काम करावं. सव्वा कोटी देशवासीय हा भाजपाचा परिवार आहे. आम्ही पक्षाच्या आधी देशासंदर्भात विचार करतो. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस ट्रिपल तलाकची प्रथा बंद करू इच्छित नाही. सव्वाशे वर्ष जुन्या पक्षात आता काही राहिलं नाही. काँग्रेस देशासाठी एक ओझं झालं आहे. शब्दकोशात अशी कोणतीही शिवी नाही, ज्याचा काँग्रेसनं माझ्याविरोधात वापर केला नाही. माझ्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडलेली नाही. परंतु जेवढे चिखलफेक करतील तेवढे कमळ फुलेल, असंही मोदी म्हणाले आहेत.